विषाणू सूक्ष्म आणि निर्जीव असतात. जीवाणू (बॅक्टेरिया), वनस्पती, प्राणी या इतर सजीवांना विषाणूचा संसर्ग झाल्यास वेगवेगळे रोग होण्याची शक्यता असते. कधी कधी संसर्ग झालेल्या सजीवांचा मृत्यू होण्याचीही शक्यता असते. मानवी शरीरात असतात तशा पेशी विषाणूंमध्ये नसतात. त्यामुळे विषाणूंना विकसित होऊन वाढण्यासाठी यजमान पेशीची (होस्ट सेलची) गरज असते. बहुतेक विषाणू तीन गोष्टींपासून बनलेले असतात – विषाणूची माहिती ज्यात साठवलेली असते ती रासायनिक रचना, त्याला संरक्षक कवच आणि सर्वात बाहेरील एक आवरण (एन्व्हलोप). विषाणू सजीवांपेक्षा वेगळे असले तरी, दोन्हींमध्ये असणारे एकमेव साम्य म्हणजे त्यांची जनुकीय माहिती रासायनिक रचनांमध्ये साठवलेली असते (सजीवांच्या डीएनए आणि आरएनए मध्ये आणि विषाणूंच्या आरएनए मध्ये). स्वतःच्या अनेक प्रती बनवण्यासाठी विषाणू सजीव पेशीत प्रवेश करतो आणि त्या पेशीच्या यंत्रसामग्रीचा ताबा घेतो. याप्रकारे विषाणूच्या अनेक प्रती त्या सजीव पेशीत तयार होतात. अशी सजीव पेशी मग फुटते आणि विषाणूचे कण इतर पेशींवर पसरतात. काही वेळा विषाणूची प्रत बनवताना रासायनिक रचनांमध्ये असलेल्या जनुकीय माहितीत काही बदल होण्याची शक्यता असते (ज्यांना उत्परिवर्तन किंवा इंग्रजीत म्युटेशन म्हणतात). असे झाल्यास औषधोपचार शोधणे अवघड होते. सार्स, इन्फ्लुएन्झाचा विषाणू, आणि एन-कोविड १९ हे मानवी शरीरावर परिणाम करणारे विषाणू आहेत. अलीकडे जगभर पसरलेल्या एन-कोविड १९ विषाणूचा संसर्ग आधी प्राण्यांना झाला होता. चीनमधील एका जिवंत प्राणी बाजारातून याचा संसर्ग माणसांना झाला.
विषाणू: म्हणजे काय?
