कोविड १९ महामारी दरम्यान अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर्स वैयक्तिक स्वच्छतेसाठीचे उत्पादन म्हणून लोकप्रिय झाले आहेत. सीडीसी (सेन्टर्स फॉर डिसीज कंट्रोल) च्या सांगण्यानुसार, जेव्हा साबण आणि पाणी उपलब्ध नसेल, तेव्हा सॅनिटायझरचा उपयोग केला जाऊ शकतो. बहुतांश अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर्समध्ये आयसोप्रोपाइल अल्कोहोल किंवा इथाईल अल्कोहोल असते.
अल्कोहोलमुळे पेशींच्या, व्हायरसेसच्या आवरणाला हानी होते. त्यामुळे, कठीण पृष्ठभागांवर किंवा त्वचेवर अल्कोहोल फवारल्यास त्यावर असणारे रोगजंतू मारले जातात. म्हणूनच पृष्ठभागांवर जंतुनाशक म्हणून किंवा जखमेतून संसर्ग होऊ नये यासाठी अँटीसेप्टिक म्हणून अल्कोहोल वापरले जाते.
मात्र, अल्कोहोलच्या वापराच्या काही मर्यादा आहेत. कवच नसणारे बीजाणू किंवा बाह्य आवरण नसणारे व्हायरसेस अल्कोहोलमुळे मरत नाहीत. त्वचेवर अल्कोहोल वारंवार वापरल्याने त्वचा कोरडी पडू शकते, चुकुन डोळ्यात गेल्यास आग होऊ शकते.
अनेक अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर्स असा दावा करत आहेत की या पदार्थांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. आपल्या शरीराने परकीय जंतूंपासून दिलेले संरक्षण म्हणजे रोगप्रतिकारशक्ती. अल्कोहोलसारखी जंतुनाशके त्वचा किंवा पृष्ठभागांवरील रोगजंतूंना नष्ट करतात. यामुळे संसर्गजन्य जंतू आपल्या शरीरात जाण्याची शक्यता कमी होते. मात्र एकदा शरीरात शिरलेल्या आणि संसर्ग केलेल्या जंतूंचा नाश करण्यासाठी रोगप्रतिकारशक्तीवर अल्कोहोलमुळे कोणताही फरक पडत नाही.
